Marathi

कथा-ग्रामदेवतेची: यात्रा उत्सव आणि नवरात्रीची

Story by: Mahadu Chindhu Kondar

Read the translated story in English

नमस्कार मंडळी,

इतिहासाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की, “History is the guide of man” and ” history is the lamp of experience”! म्हणून मी माझ्या ग्रामदेवतेची कथा आपल्या समोर मांडणार आहे. ही कथा मला माझे आई-वडील व गावातील प्रौढ माणसांनी सांगितली. ही कथा बदलत्या युगानुसार पुढील येणार्‍या पिढ्यांना कळावी, समजावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न…!

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुरूषवाडी गावात जाखुबाई व हनुमान मंदिर ही दोन देवळे अस्तित्वात होती. अज्ञान, अंधश्रध्दा, शिक्षणाचा अभाव पण रूढी-परंपरा व संस्कृती, माणुसकी जपणारी माणसं या गावात नांदत होती.

लोक सांगतात की, १५० ते २०० वर्षांपूर्वी  गावात महामारीचे दुखणे आले. (उदा.आजच्या काळातील कोरोना व्हायरस सारखा आजार) एकाचवेळी अनेक कुटुंबातील लोक आजारी पडायचे. हातापायांना शक्ती नसायची. तोंडातून आवाज देखील निघायचा नाही. लोक अंथरूणावर पडून रहायचे, त्यातच त्यांचा अंत व्हायचा. संपूर्ण गावावरच  दु:खाची शोककळा पसरली. या महामारीत बर्‍याच कुटुंबातील लोक मरण पावले. त्यामुळे लोकांना वाटले की, देवी-देवतांचा कोप झाला. त्यामुळे लोक गावात न राहता कोणी स्वत:च्या शेतात कोणी दूरवर टेकडीवर राहू लागले. संपूर्ण गावच ओस पडला. पण मंदिरं तेवढी राहिली.       

असा देवतांचा कोप का झाला असावा, याचा विचार करता करता त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, आपल्या गावात दोन मंदिरे शेजारी-शेजारी असून एक जाखुबाईचे आणि एक हनुमानाचे. तर या वृद्ध लोकांनी असा निष्कर्ष काढला की हनुमान देवता ब्रम्हचारी असून जाखुबाई ही स्त्री शक्ती स्वरूपात आहे मग ही दोन्ही मंदिरे शेजारी नकोत. म्हणून पूर्वीच्या काही जाणकार वृद्धांनी श्री हनुमान देवतेची मूर्ती मुळा नदीत नेवून विसर्जित केली. तेव्हांपासून आजपर्यंत फक्त जाखुबाईचीच आराधना लोक करायला लागले. जाखुबाईला लोक संकटांपासून रक्षण करणारी देवता मानतात. (उदा. साथीचे रोग, दुष्काळ पडणे) अशी संकटे गावावर ओढवल्यास आजही गावातील महिला वर्ग मंदिराकडे जाऊन जाखुबाईला पाण्याने आंघोळ घालतात.

The two vermillion colored stones are the old form of Jakhubai. The idol was added as recently as 2018. Photo: Mahadu Chindhu Kondar

साधारणत: १०० ते १२५ वर्षापूर्वी या लोकांनी या मातेचा यात्रा उत्सव सुरू केला. (पूर्वी अगदी साध्या पद्धतीने उत्सव लोक करायचे. परंतु बदलत्या काळानुसार सध्याच्या उत्सवात बदल घडलेले आहेत) तेंव्हापासून कोणतेही मोठे संकट गावावर ओढवलेलं नाही.     

कोरोना बद्दल लोक असे समजतात की कोरोना हे नावच फक्त नवीन असावं. या रोगाची लक्षणं(सर्दी, खोकला, ताप) जुनीच आहेत की जी जन्माला येणार्‍या प्रत्येक माणसाने अनुभवलेली आहेत. परंतु या सन २०२०-२१ या वर्षात पूर्ण जगात कितीतरी लोकांचा मृत्यू झाल्याने लोक काळजी घेतात. सरकारी नियमांचे पालन करतात आणि जाखुबाई देवतेवर श्रद्धा सुद्धा ठेवतात. या वर्षी सुद्धा कोरोना संकटाची पीडा टळावी म्हणून लोकांनी जाखुबाईची आराधना केली आहे.           

माझा वैयक्तिक अनुभव असा की, मी अंधश्रध्देला मानत नाही. परंतु जाखुबाई ही आमची ग्रामदेवता असल्याने तिच्यावर श्रद्धा निश्चितच ठेवतो. दरवर्षी मी जाखुबाईच्या यात्रा उत्सवात व नवरात्री उत्सवात सहभागी होतो. कारण ते आमचे श्रद्धास्थान आहे. हे दोन्ही उत्सव मला फार आवडतात. कारण या उत्सवांच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येतात, नातेवाईक एकत्र येतात. मिळून-मिसळून राहतात. गाव हिताच्या दृष्टीने बैठका होतात व यातूनच गावच्या व लोकांच्या समस्या, एकमेकांची सुख-दुःखे समजतात. त्यामुळे अशा समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळते किंवा इतरांना मार्गदर्शन करता येते. आज कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग हादरलेलं आहे. परंतु या अगोदर सुद्धा अनेक महाभयंकर रोग आलेले होते. (उदा. स्वाईन फ्ल्यू, ईबोला, कर्करोग.) त्यावर औषधं आलीच ना. मग कोरोनावर पण काहीतरी तोडगा नक्की निघेल. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. घाबरून जाऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती गमवून बसू नये. शासनाने सुचवलेल्या नियम-अटींचे तंतोतंत पालन करावे. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कदाचित वेळ लागेल, परंतु औषध नक्कीच येईल. मग पहा संपूर्ण जग कोरोना मुक्त होईल.

सालाबादप्रमाणे दरवर्षी चैत्र महिन्यात षष्टीला या जाखुबाईचा मोठ्या थाटामाटात यात्रेचा उत्सव असतो. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या यात्रेला येत असतात. दोन दिवस हा उत्सव चालतो. मंदिराला सर्व सजावट करून नटवलेले असते. पहिल्या दिवशी ६ ते ७ वाजता यात्रेच्या काठीची मिरवणूक असते. या कार्यक्रमात गावच्या काही महिला केस मोकळे सोडून हातात पंचारतीचे ताट घेऊन देवीला दंडवत घालतात. वेगवेगळ्या रंगाच्या कापडी पताकांची झालर व मोरपिसांचा तुरा असलेली काठी ढोल-ताशांच्या गजरात मंदिराकडे रवाना होते, आणि जाखुबाईच्या मंदिराला पाच वेढे मारून पूजा करून काठी उभी बांधून ठेवतात. त्यानंतर प्रसाद म्हणून गूळ व नारळ वाटप करतात.       

काठीची मिरवणूक झाल्यावर महाराष्ट्राची लोकपरंपरा म्हणून लोकांच्या मनोरंजनासाठी तमाशा किंवा भजनी भारूडाचा कार्यक्रम असतो.       

दुसऱ्या दिवशी सकाळी हाजर्‍यांचा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी ४ वाजता पहिलवानांसाठी आखाडा (कुस्त्या) असतो. प्रथम नवसाच्या कुस्त्या लावल्या जातात. त्यानंतर १० रू. पासून १००१ रू. ते २००१ रू. पर्यंत कुस्त्या खेळून पहिलवान आपला खेळ दाखवतात. शेवटी हरहर महादेव, जाखुबाई की जय बोलून गोडीशेव व रेवडी हा खाऊ प्रसाद म्हणून वाटतात व यात्रेच्या कार्यक्रमाची सांगता करतात.       

Wrestling competition during the pilgrimage festival. Photo: Grassroutes

पुरूषवाडी गावात विठ्ठल मंदिर, शिवमंदिर, हनुमान मंदिर, कृष्ण मंदिर नाही. म्हणून गावात ‘हरिनाम सप्ताह’ साजरा होत नाही. मूळमाता आई जाखुबाईचे मंदिर असल्याने सन २००० पासून भव्यदिव्य असा नवरात्री उत्सव साजरा केला जातो. कारण गावातील लोकांना सांप्रदायाची सवय लागावी, अन्नदान करण्याची संधी मिळून पुण्य पदरी पडावे म्हणून वर्षातील किमान नऊ दिवस तरी हरिपाठ, भजन, कीर्तन व भोजन सोहळ्याने परिसर अगदी दुमदुमून जावा अशी ग्रामस्थांची आणि आम्हा सर्व तरूणांची ईच्छा होती. म्हणून नवरात्री उत्सवाची परंपरा २० वर्षापूर्वी सुरू केली.  त्या अगोदर पूर्वी घटस्थापना व्हायची, दसरा सण व्हायचा पण आंबा मातेची मूर्ती बसवून मोठा उत्सव होत नसायचा. 

घटस्थापनेच्या दिवशी मुंग्यांच्या किंवा सर्पाच्या वारूळाची माती आणून ती माती केळीच्या पानांवर ठेवून त्यामध्ये गहू, हरभरा, वाटाणा, गोडवाल, कडूवाल,लाख व मसूर असे ७ प्रकारचे धान्य-कडधान्य यांचे मिश्रण करून त्या मातीत पेरतात; आणि एका नवीन मडक्यात पाणी भरुन धान्य पेरलेल्या मातीवर ठेवतात व हळद-कुंकू वाहतात.हे घट देवतेच्या समोर मांडलेले असतात.       

Sowing seeds and grains to decide what will give the best yield that year. Photo: Mahadu Kondar

नऊ दिवस झेंडूच्या/खुरासण्याच्या फुलांची माळ देवीजवळ तोरण करून बांधली जाते. दहाव्या दिवशी माळ बांधून ह्या घटाचे उगवून आलेल्या धांन्यांचे निरिक्षण करून कोणत्या प्रकारचे धान्य जोरदार उगवले आहे ते  पाहून त्या वर्षी रब्बी हंगामात तेच धान्य भरघोस उत्पन्न देणार अशी लोकांची धारणा/श्रद्धा आहे. म्हणून ते कडधान्य शेतात पेरले जाते.        

दहाव्या किंवा अकराव्या दिवशी ज्या तिथीवर दसरा सण येईल, त्या दिवशी सकाळी १० वाजता देवीजवळ व मंदिरात वाढलेली धान्याची रोपे ऊपटून घेतात. त्या रोपांना आमच्या ग्रामीण भाषेत धन किंवा घट म्हणतात. ही रोपे(घट/धन) लोक उपटून घेतल्यानंतर कानाला अडकवितात.       

Outside the Jakhubai temple, the priest washes this stone sculpture with water everyday and asks for the well-being of the village. Photo: Mahadu Kondar

त्यानंतर सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत काल्याचे कीर्तन होते. नंतर महाप्रसाद म्हणून भोजन होते. दूपारच्यावेळी फुगडी, भोवरा, पिंगा खेळतात व गाणी गातात. उदा. खेळू भऊरा गं….खेळू भऊरा गं…. राधिकेचा नऊरा गं….       

शेवटी भजनाच्या नामघोषात देवीच्या मूर्तीची मिरवणूक निघून आरती ओवाळून या देवीचे कुरकुंडी नदीच्या पात्रात विसर्जन करतात. अशा पध्दतीने या नवरात्री उत्सवाची सांगता करतात. अशी ही जाखुबाई यात्रा उत्सव व नवरात्रीची कथा सकळ संपूर्ण..!

Read the translated story in English

Meet the storyteller

Mahadu Chindhu Kondar
+ posts

Mahadu has completed his BA / D.ED and teaches at the Sangli District Council School. He is a master trainer and senior guide cum facilitator in Purushwadi village. He has been working on a local climate change adaptation watershed project for the past 5 years. He has a keen interest in reading, writing and documenting the old way of life in Purushwadi.

Grassroutes Journeys
Website | + posts

Grassroutes Journeys is a national award winning social enterprise that aims to develop sustainable livelihoods in rural India through community-centered tourism enterprises – owned, managed and run by local communities. It is working across 17 financially sustainable village tourism centers in 4 states – Maharashtra, Madhya Pradesh, Andhra Pradesh and Gujarat. Its rural tourism model has created over 15,000 days of employment annually, impacted about 700 households with alternate source of livelihoods, and helped in reverse migration and conservation of biodiversity.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares